व्हिजन २०४७’मधून विकसित गडचिरोलीची दिशा; आरोग्य, शिक्षण, रोजगार व पर्यटनाला प्राधान्य.
Oplus_131072
आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन व आदिवासी विकासावर भर; माजी आ. डॉ. देवराव होळी यांची पत्रकार परिषदेत माहिती
गडचिरोली |
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि समावेशक विकासासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ हा व्यापक विकास आराखडा मांडण्यात आला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती, आदिवासी संस्कृती, कृषी, बांबू, लघुवनोपज, वनऔषधी आणि जलस्रोतांचे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करून रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा संकल्प या आराखड्यात करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.
७ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विलास देशमुखे, अमोल कुळमेथे, डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, पुष्पलता कुमरे, रमेश उईके, आरती कोल्हे, योगेश कुमरे, काशिनाथ देवगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. होळी म्हणाले की, युवक, महिला, शेतकरी, वनआधारित कामगार आणि वंचित घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच दुर्गम भागात प्रशासनाची प्रभावी उपस्थिती आणि डिजिटल सेवांचा विस्तार करण्यावर ‘व्हिजन २०४७’मध्ये भर देण्यात आला आहे.
आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढवून किमान १०० खाटांचे रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांचे सक्षमीकरण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किमान २० खाटांची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, कुरखेडा आणि सिरोंचा येथे आधुनिक ट्रॉमा केअर युनिट उभारण्याची मागणी करण्यात आल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले.
शिक्षण व रोजगाराला चालना
आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वसतिगृहे, स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्रे तसेच उच्च दर्जाच्या वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षण संस्थांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट या आराखड्यात मांडण्यात आले आहे.
बांबू, लघुवनोपज, वनऔषधी, कोसा, शेळीपालन, पशुपालन आणि मत्स्यव्यवसायावर आधारित उद्योगांना चालना देण्यासोबतच ‘वन डिस्ट्रिक्ट, फाईव्ह प्रोडक्ट’, शेतकरी उत्पादक कंपन्या, गोदामे आणि सक्षम बाजारपेठ उभारण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच गडचिरोली औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याचाही प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन विकासावरही विशेष भर
वैनगंगा–प्राणहिता–गोदावरी नदीक्षेत्राचा पर्यटन व मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने विकास, ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन, मार्कंडा देव तीर्थक्षेत्राचा विकास तसेच ‘गडचिरोली सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
यासोबतच ग्रामसभा सक्षम करणे, लघुवनोपज व्यवस्थापन, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यावरही भर देण्यात आला आहे.
‘विकास हवा, पण ओळख गमावून नाही’
“विकास हवा, पण आपली ओळख गमावून नाही,” या भूमिकेतून गडचिरोलीतील आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करत विकासाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्पष्ट केले.
