स्कॉर्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकाचा मृतदेह; गडचिरोलीत खळबळ.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

गडचिरोली | 

गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील नंदनवननगर परिसरात एका स्कॉर्पिओ वाहनात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत युवकाची ओळख केतन पोचमपल्लीवार (वय 33, रा. मूल, जि. चंद्रपूर) अशी झाली असून ते गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन पोचमपल्लीवार हे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातील सदस्यांना बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. रविवारी (दि. 6) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नंदनवननगर परिसरात MH-33 AC-4684 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाच्या पुढील प्रवासी आसनावर ते बसलेल्या अवस्थेत आढळून आले.

त्यांच्या नाकातून व तोंडातून फेसासारखा पदार्थ बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. हालचाल जाणवत नसल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

केतन हे गडचिरोली शहरालगतच्या नवेगाव परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या निवासस्थानापासून मृतदेह आढळून आलेल्या नंदनवननगर परिसराचे अंतर सुमारे पाच किलोमीटर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ते स्कॉर्पिओ वाहनापर्यंत कसे पोहोचले, वाहन कोणाचे होते आणि त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल तसेच पोलिस तपासातून या घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून, तपासाच्या निष्कर्षानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!