भेंडाळ्यात निनावी चिठ्ठीद्वारे मुला-मुलींना मारण्याची धमकी; चामोर्शी पोलिसांकडून तपास सुरू.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

                             प्रेस नोट

 

चामोर्शी | दि. ५ सप्टेंबर : भेंडाळा गावात एका घराच्या अंगणात संशयास्पद वस्तू व निनावी चिठ्ठी आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चिठ्ठीत गावातील मुला-मुलींना मारून टाकण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी चामोर्शी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास भेंडाळा येथील विपुल अशोक उंदीरवाडे यांच्या घराच्या अंगणात एक प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आली. त्यामध्ये ९० एमएल देशी दारूच्या रिकाम्या बाटलीला मध्यभागी छेद करून त्यात घरगुती भाजी कापण्याचा चाकू ठेवण्यात आला होता. चाकूवर रक्तासारखा दिसणारा लाल रंग टाकण्यात आला होता. त्यासोबत वहीच्या चार पानांवर हस्ताक्षरात निनावी संदेश लिहून गावातील मुला-मुलींना मारून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर प्रकाराची माहिती उंदीरवाडे यांनी प्रथम गावातील पोलीस पाटील व शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर दि. ३ सप्टेंबर रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. बीट अंमलदार शिवदास दुर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन उंदीरवाडे यांच्याकडून माहिती घेतली व पोलीस ठाणे  पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांना कळविले.

यानंतर पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी बीट अधिकारी सुमेध बनसोडे यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, सदर वस्तू व निनावी चिठ्ठी ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीबाबत तत्काळ कोणतीही खात्रीलायक माहिती मिळाली नाही.

दि. ५ सप्टेंबर रोजी विपुल अशोक उंदीरवाडे (वय ३१, रा. भेंडाळा) यांच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात निनावी चिठ्ठीद्वारे गावातील मुला-मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि. सुमेध बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. संशयित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ चामोर्शी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गावातील मुला-मुलींनी सतर्क राहावे आणि पालकांनीही त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेमागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!