धाडसी कामगिरीची दखल; सहायक पोलीस निरीक्षक निशा खोब्रागडे यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरव.
Oplus_131072
नागपूर | प्रतिनिधी

गोधनी रेल्वे येथील फागोजी लेआउट परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या गंभीर गॅसगळतीच्या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विषारी वायूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना मानकापूर पोलीस स्टेशनच्या सहा. पोलीस निरीक्षक निशा खोब्रागडे यांनी प्रसंगावधान दाखवत बचावकार्याची धुरा प्रभावीपणे सांभाळली.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्वतःच्या जीविताची पर्वा न करता त्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, गॅसबाधित नागरिकांना प्राथमिक मदत मिळवून देणे तसेच त्यांना वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
निशा खोब्रागडे यांच्या तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळण्यास मदत झाली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरव केला.
यावेळी त्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक करत भविष्यातही याच सेवाभावी वृत्तीने कार्य करत नागपूर शहर पोलीस दलाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली.


