हिंसेपासून नवजीवनाकडे; आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनाला गती.
Oplus_131072
१४ जणांना भूखंड वाटप; पुनर्वसन निधी, मुलांना सायकली-शैक्षणिक साहित्य अन् प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना वाहन परवाने
गडचिरोली, दि. २ सप्टेंबर : हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता आणि विकासाची वाट स्वीकारलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने व स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत पुनर्वसनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात १४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. यासोबतच पुनर्वसन निधीचे धनादेश, आत्मसमर्पित सदस्यांच्या मुलांना सायकली व शैक्षणिक साहित्य तसेच वाहनचालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सदस्यांना चारचाकी वाहन चालविण्याचे परवाने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयातून आत्मसमर्पित सदस्यांसाठी आतापर्यंत १७४ भूखंड मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी यापूर्वी १५३ भूखंडांचे वाटप करण्यात आले असून, नव्या वाटपामुळे पुनर्वसन प्रक्रियेला आणखी चालना मिळाली आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ८१९ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण करून शांतता, विकास आणि मुख्य प्रवाहातील जीवनाचा मार्ग स्वीकारला आहे. आत्मसमर्पित सदस्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षण, कौशल्यविकास आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आत्मसमर्पित सदस्यांनी शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. तर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास आणि प्रगतीची वाट निवडणाऱ्या आत्मसमर्पित सदस्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हिंसेपासून शांततेकडे… पुनर्वसनातून स्वावलंबनाकडे… आणि नवजीवनातून उज्ज्वल भविष्याकडे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
