आमदार मसराम यांच्या नेतृत्वात शेतकरी-कष्टकऱ्यांच देसाईगंज SDO कार्यालयावर महामोर्चा; विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन.
Oplus_131072
आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात आंदोलन; धान बोनस, कर्जमाफी, स्मार्ट मीटर, ओबीसी जनगणना व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले

देसाईगंज, दि. ३१ ऑगस्ट | प्रतिनिधी :
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, बेरोजगार तसेच महागाई आणि स्मार्ट मीटरच्या समस्यांनी त्रस्त नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली देसाईगंज येथे जोरदार महामोर्चा काढण्यात आला. ढोल-ताशांचा गजर आणि बैलगाड्यांसह शेकडो नागरिकांचा मोर्चा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला.
यावेळी आंदोलकांच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान यांच्यामार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धान बोनस तातडीने देण्याची मागणी
सन २०२५-२६ मधील धानाचा बोनस तात्काळ अदा करावा, तसेच २०१७ पूर्वी कर्जमाफीस पात्र ठरूनही कर्जमाफीच्या यादीत समावेश न झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे, रासायनिक कीटकनाशके व अन्य निविष्ठांच्या वाढत्या किमती कमी करून महागाईवर नियंत्रण आणावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
‘स्मार्ट मीटर’विरोधातही आक्रमक भूमिका
वीज ग्राहकांवर आर्थिक भार वाढत असल्याचा आरोप करत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि बसविलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पूर्ववत बसवावेत, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
ओबीसी जनगणना आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही आवाज
जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवून स्वतंत्र ओबीसी जनगणना करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शासकीय व निमशासकीय शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही करण्यात आली.
निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना नियमित व वाढीव शिष्यवृत्ती द्यावी, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला बाधक ठरत असल्याचा आरोप असलेला ५ ऑगस्ट २०२६ चा शासन निर्णय (जीआर) तात्काळ रद्द करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
या महामोर्चात देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची परिसरातील काँग्रेस पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, आदिवासी व कष्टकरी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परसराम टिकले, जीवन पाटील नाट, राजेंद्र बुल्ले, मिलिंद खोब्रागडे, मनोज अग्रवाल, नितीन राऊत, श्याम उईके, इलियास पठाण, प्रभाकर तुलावी, जयमाला पेंदाम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
