पुलाअभावी गर्भवती महिलेला खाटेची कावड; एटापल्लीतील कोइदुळमध्ये विकासाच्या दाव्यांची पोलखोल.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

खोटे आश्वासने,परिस्थिती जैसे थे??

लोकप्रतिनिधी हे लोकांचा फक्त मतासाठी वापर.

गडचिरोली(एटापल्ली) : रस्ते नाहीत, पूल नाही; पावसाळ्यात नाले ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. विकासाच्या गप्पा आणि प्रत्यक्षातील विदारक वास्तव यातील दरी पुन्हा एकदा समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील कोइदुळ गावात २८ ऑगस्ट रोजी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी खाटेची कावड करून पुरातून बाहेर आणण्याची वेळ आली. या घटनेने दुर्गम भागातील आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेची अक्षरशः पोलखोल झाली आहे.

गावाजवळील नाल्यावर अद्याप पूल नसल्याने पावसाळ्यात कोइदुळवासीयांचा संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होते. रस्ता अपुरा असल्याने रुग्णवाहिकेलाही गावापर्यंत पोहोचणे कठीण होते. परिणामी, गंभीर परिस्थितीत रुग्णांना वाहनाऐवजी खाटेवरूनच नाल्याचा मार्ग पार करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते.

गर्भवती महिलेला सुरक्षित आणि वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी खाटेची कावड केली. पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करण्याची ही वेळ केवळ त्या कुटुंबाची शोकांतिका नसून, दुर्गम भागातील मूलभूत सुविधांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

विकासाच्या घोषणा हवेत; कोइदुळमध्ये मात्र खाटेची कावड!

एकीकडे ग्रामीण विकास, रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात एखाद्या गर्भवती महिलेला उपचारासाठी खाटेवरून नाला पार करावा लागत असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हातावर राखी बांधण्याऐवजी तिच्या सुरक्षित आरोग्यासाठी भाऊ आणि नातेवाईकांना खाटेची कावड करावी लागणे, ही प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

प्रशासन आणखी किती बळीची वाट पाहणार?

पावसाळ्यात नाल्यावरून ये-जा करणे धोकादायक बनत असताना प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पूल नसल्यामुळे एखाद्या रुग्णाचा उपचारासाठी पोहोचण्यास विलंब होऊन अनर्थ घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

कोइदुळ गावाजवळील नाल्यावर तातडीने पूल उभारावा, बारमाही रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचेल अशी दळणवळण व्यवस्था निर्माण करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटोतील दृश्य प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांना आरसा दाखवणारे आहे—पुलाअभावी आज खाटेची कावड, उद्या कोणाचा जीव?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!