दुर्गम भागातील तिहेरी गर्भधारणेवर यशस्वी उपचार; आईसह तिन्ही नवजात सुरक्षित.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

गडचिरोली | प्रतिनिधी

एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील ३२ वर्षीय आदिवासी महिलेची उच्च जोखमीची तिहेरी गर्भधारणा वैद्यकीय पथकाच्या दक्ष नियोजनामुळे यशस्वीपणे पार पडली. हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (एलकेएएमएच) तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या तीन मिनिटांत दोन मुली आणि एका मुलाचा जन्म झाला. सध्या आईसह तिन्ही नवजातांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर विशेष नवजात देखभाल विभागात उपचार सुरू आहेत.

मगेर या आदिवासीबहुल गावातील महिलेने मार्च २०२६ मध्ये प्रथमच रुग्णालयात तपासणी केली होती. अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भात तीन बाळे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांनी ही गर्भधारणा उच्च जोखमीची असल्याने विशेष देखरेखीखाली उपचार सुरू केले. नियमित तपासण्या, अल्ट्रासाऊंड आणि गर्भातील बाळांच्या हृदयगतीचे निरीक्षण करण्यात येत होते.

११ ऑगस्ट रोजी पोटात आणि पाठीच्या खालच्या भागात सौम्य वेदना सुरू झाल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अकाली प्रसूतीची शक्यता लक्षात घेऊन बाळांच्या फुफ्फुसांच्या विकासासाठी आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तसेच संभाव्य आपत्कालीन शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर रक्ताचीही आगाऊ व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी तपासणीदरम्यान तिन्ही बाळांच्या रक्ताभिसरणात आणि हृदयगतीत चिंताजनक बदल आढळले. त्यामुळे विलंब न करता सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३२ आठवडे ५ दिवसांची गर्भधारणा पूर्ण झाल्यानंतर रात्री १.२५ ते १.२७ या अवघ्या तीन मिनिटांत तिन्ही बाळांचा जन्म झाला.

जन्मावेळी बाळांचे वजन अनुक्रमे १ किलो ३६० ग्रॅम, १ किलो १८६ ग्रॅम आणि १ किलो ५३० ग्रॅम होते. तिन्ही बाळांचा जन्म अकाली झाल्याने त्यांना तत्काळ विशेष नवजात देखभाल विभागात हलविण्यात आले.

या गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी दोन स्त्रीरोगतज्ज्ञ, दोन भूलतज्ज्ञ आणि दोन बालरोगतज्ज्ञांचे पथक कार्यरत होते. वेळेवर घेतलेला निर्णय, पूर्वनियोजन आणि वैद्यकीय पथकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य गुंतागुंत टाळण्यात यश आले.

दुर्गम आदिवासी भागातील उच्च जोखमीची तिहेरी गर्भधारणा यशस्वीपणे हाताळत आईसह तिन्ही नवजातांना सुरक्षित ठेवण्यात आलेले हे प्रकरण गडचिरोलीच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण वैद्यकीय यश मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!