शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या अधिष्ठात्यांचे अभिनंदन; आरोग्यसेवेच्या प्रश्नांवर डॉ. होळी यांची चर्चा.
गडचिरोली | दि. २२ ऑगस्ट २०२६
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोलीच्या अधिष्ठातापदी नव्याने रुजू झालेले डॉ. राजेंद्र सुरपाम यांची भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन डॉ. सुरपाम यांचे अभिनंदन करत त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेसमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, अत्याधुनिक आणि वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.
गडचिरोली हा दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्हा असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची भूमिका महत्त्वाची असून, नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यासाठी आवश्यक त्या सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे डॉ. देवराव होळी यांनी यावेळी नमूद केले.
जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही डॉ. होळी यांनी दिले. नव्या अधिष्ठात्यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून गडचिरोलीतील आरोग्यसेवेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, डॉ. छाया उईके, डॉ. विलास कुमरे, डॉ. अरविंद आलाम आदी उपस्थित होते.
