आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आमदार मसराम मैदानात; ५ ऑगस्टचा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी.
Oplus_131072
गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी संघ-विदर्भ, नागपूर यांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार रामदास मसराम यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेत त्यांनी आंदोलनाला ठाम पाठिंबा व्यक्त केला.
५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयातील जाचक अटी तातडीने मागे घ्याव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांचा शासनाने गांभीर्याने पुनर्विचार करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी भूमिका आमदार मसराम यांनी मांडली.

“विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा गुन्हा नसून त्यांचा लोकशाही अधिकार आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू,” असा निर्धार आमदार रामदास मसराम यांनी व्यक्त केला.
या आंदोलनस्थळी माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार संजय मेश्राम आणि सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार यांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समान संधी, न्याय्य सुविधा तसेच घटनात्मक व शैक्षणिक हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष थांबणार नाही; न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार!” असा ठाम संदेश आंदोलनस्थळावरून देण्यात आला.
