मार्कंडा देवस्थानातील विकासकामांना वेग; एमएसआरडीसीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्याकडून रात्री पाहणी; अतिक्रमण, पर्यायी व्यवस्था व वाहतूक व्यवस्थापनाचा घेतला आढावा
अतिक्रमणाबाबत पर्यायी व्यवस्थेच्या सूचना; वाहतूक व्यवस्थापनाचाही आढावा
गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थान परिसरातील विकास व संवर्धन कामांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी रात्री प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत सुरू असलेली कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश हेही उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी एमएसआरडीसी तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून सद्यस्थिती आणि कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
एमएसआरडीसीच्या अखत्यारितील प्रलंबित कामांचे योग्य नियोजन करून कामांना आवश्यक गती द्यावी आणि निर्धारित कालमर्यादेत ती पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या. विशेषतः एमएसआरडीसीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास नेण्यावर त्यांनी भर दिला.
मार्कंडा परिसरातील एएसआयच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास व संवर्धन कामांचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती आणि प्रगतीची माहिती घेत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, देवस्थान परिसरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर संबंधित नागरिकांशी संवाद साधून तोडगा काढावा, तसेच प्रभावित नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी दिले.
वाहतूक व्यवस्थापनावरही चर्चा
मार्कंडा देवस्थान परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी चर्चा केली. भाविकांची वाढती वर्दळ लक्षात घेता वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना दिल्या.
मार्कंडा देवस्थान परिसरातील विकास, संवर्धन आणि पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी, एएसआय, पोलीस विभाग व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी पाहणीदरम्यान दिले.
