युवा संकल्प संस्थेच्या सामाजिक कार्याला जिल्ह्याचा मान; राहुल वैरागडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा गौरव.
Oplus_131072
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गडचिरोली जिल्हा युवा संस्था पुरस्कार (२०२५-२६)’ ने कु. राहुल वैरागडे यांच्या युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेला आज दि. १५/०८/२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच युवक कल्याणासाठी राहुल वैरागडे यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वृक्षारोपण, युवकांना योग्य मार्गदर्शन, विविध सामाजिक उपक्रम, ग्रामविकास तसेच ग्रामस्थांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा देणे आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर विधायक पद्धतीने काम करणे, या कार्याची दखल घेत युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून संस्थेचा गौरव करण्यात आला.गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर, सहायक जिल्हाधिकारी अरुण एम., डॉ. अजय डोके, अपर जिल्हाधिकारी नितीन गावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
