एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण; पंचायत समिती चामोर्शीतून सामाजिक समानतेचा संदेश.

0
Polish_20260813_215255572
Spread the love

                               प्रेस नोट

 

चामोर्शी, दि. 14 ऑगस्ट २०२६ :
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंचायत समिती, चामोर्शी येथे यावर्षी एक आगळावेगळा आणि सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, श्री. सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून दोन एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भेंडाळा येथील सौ. अर्चना अनिल कारंडे आणि इल्लूर येथील सौ. भाग्यश्री अरुण मडावी यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दोन्ही महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

समाजामध्ये अनेक महिला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. अशा महिलांना केवळ सहानुभूती न देता सन्मान, समान संधी आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख सामाजिक संदेश आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान एकल महिलांना देऊन “महिलांचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान” आणि “समानतेतून सक्षम समाजनिर्मिती” असा सकारात्मक संदेश पंचायत समिती चामोर्शीच्या माध्यमातून देण्यात आला.

या उपक्रमामुळे एकल महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासोबतच समाजातील इतर महिलांनाही सक्षमपणे पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

— प्रकाश पोळ, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, चामोर्शी
जि. गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!