राष्ट्रीय एकता दिन उत्साहात; कोरचीत ‘रन फॉर युनिटी’सह सायबर जनजागृती रॅली.
Oplus_131072
मॅरेथॉनमध्ये ३०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग; चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी दिला एकतेचा संदेश

कोरची, दि. ३१ ऑक्टोबर : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून कोरची पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी ‘रन फॉर युनिटी’ आणि ‘डिजिटल एकता मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक, युवक-युवती, पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मॅरेथॉनमध्ये ३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवित राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
तीन किलोमीटरच्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
मॅरेथॉनला सकाळी ७ वाजता फवारा चौक येथून सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक दीपक डोंब आणि ज्येष्ठ नागरिक ऋषिजी रावतुरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. फवारा चौक ते बेकाठी रस्त्यावरील गुटेकसा असा तीन किलोमीटरचा मार्ग स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला होता.
स्पर्धा पूर्ण केलेल्या विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
मॅरेथॉनचे विजेते
मुलांचा गट
- प्रथम : मनीष काशीनाथ मोहुले (कोरची)
- द्वितीय : सुभाष शालीकराम हलामी (बोदालदंड)
- तृतीय : अरुण बंशीलाल काटेगे (सोहले)
मुलींचा गट
- प्रथम : प्रिती दसरो पुडो (गुटेकसा)
- द्वितीय : लक्ष्मी हरिदास ब्राह्मण (कोरची)
- तृतीय : रोहिणी रामू हलामी
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती
राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमासोबतच महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानांतर्गत फवारा चौक ते कोरची पोलीस ठाणे या मार्गावर सायबर जनजागृती रॅली काढण्यात आली. ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
याशिवाय, एकलव्य विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेसोबतच डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
#awajjantecha #korchi
पोलीस अधिकारी, शिक्षक व नागरिकांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नागेश टेकाम, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कदम, परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली बल्लाळ, एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक निकम, तसेच शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक डोक सर, ज्येष्ठ नागरिक ऋषिजी रावतुरे, नसरूजी भामानी आणि पत्रकार नंदूजी वैरागडे यांच्यासह पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ जवान, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

