तळोधी(मो) हद्दीतील खोर्दा परिसरात वाघाचा धुमाकूळ; बैल चारून परतणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

५० वर्षीय शेतकरी जखमी; प्राथमिक उपचारानंतर गडचिरोलीला हलविले, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

चामोर्शी, दि. ३१ ऑक्टोबर : शेतात बैल चारून घराकडे परतत असलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील खोर्दा गावाजवळ शुक्रवारी दुपारी घडली. या हल्ल्यात सुनील पिंपरे (वय ५०, रा. खोर्दा) हे जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पिंपरे हे आपल्या शेतात बैल चारण्यासाठी गेले होते. बैल चारून झाल्यानंतर ते घरी परतत असताना श्रावण नैताम यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात ते जखमी झाले.

घटनेनंतर जखमी पिंपरे यांना तातडीने आमगाव (म.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना चामोर्शी येथे पाठविण्यात आले. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

वनाधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी आकाश मल्लेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक सलीम कुरेशी आणि तळोधी बिटचे वनरक्षक प्रमोद धाडसे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वनविभागाच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला.

शेतीच्या कामांदरम्यान वाघाच्या दहशतीचे सावट

सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांची शेतातील वर्दळ वाढली आहे. अशातच वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने शेतात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खोर्दा परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवावी, तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!