राष्ट्रीय एकतेचा संदेश देत चामोर्शीत ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त चामोर्शी पोलिसांचा पुढाकार; विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

गडचिरोली (चामोर्शी), दि. ३१ ऑक्टोबर : राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासोबतच युवकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने चामोर्शी पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात ४० ते ५० युवक-युवतींसह स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.१५ वाजता पोलीस स्टेशन चामोर्शी येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी सहभागींसाठी ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा दोन अंतरांच्या धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, युवक-युवती आणि नागरिकांनी उत्साहाने धाव घेत राष्ट्रीय एकता, अखंडता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने चहा आणि नाश्त्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

एकतेसोबत आरोग्याचा संदेश

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ३१ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर चामोर्शी पोलिसांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमुळे युवकांमध्ये देशभक्ती, सामाजिक एकोपा आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित झाले.

पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!