‘बचपन बचाव’ अभियानांतर्गत गडचिरोलीत बालसुरक्षा व बालहक्कांविषयी जनजागृती.

0
IMG-20261027-WA0234
Spread the love

 

२६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान अभियान; विद्यार्थ्यांना सुरक्षित स्पर्श, स्वसंरक्षण व मदतीविषयी मार्गदर्शन

गडचिरोली, दि. २७ ऑक्टोबर  : बालकांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण आणि बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘बचपन बचाव’ अभियानास प्रारंभ झाला आहे. या अभियानांतर्गत २६ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या देशव्यापी ‘सुरक्षित बचपन अभियान’च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या अभियानाची मुख्य संकल्पना ‘जागरूकता, सुरक्षा आणि संरक्षण–हर बच्चे का अधिकार’ अशी असून, गडचिरोलीतील विविध शाळा यात सहभागी होणार आहेत.

शिबिरात विद्यार्थ्यांना चांगला व वाईट स्पर्श ओळखणे, भयमुक्त वातावरण निर्माण करणे, बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करणारा पोक्सो कायदा आणि मदत मिळविण्याविषयी माहिती देण्यात आली. अनोळखी व्यक्तींपासून सतर्क राहणे, तसेच पालक व शिक्षकांमध्ये बालसुरक्षेविषयी संवेदनशीलता वाढविण्याच्या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचे संरक्षण आणि आपल्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश आहे.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अं. पु. खानोरकर, पॅनेल अधिवक्ता ॲड. अरुण एम. अंजनकर, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक हबीब सय्यद, बाल कल्याण समितीचे सदस्य काशिनाथ देवगडे, कम्युनिटी नर्स किरण आर. रघुवंशी, अर्श समन्वयक विशाखा कावळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत जधाडे आणि शिक्षण विभागाचे अमरदीप गेडाम उपस्थित होते.

कार्यक्रमात जिल्हा परिषद हायस्कूल, शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालय, राणी दुर्गावती कन्या हायस्कूल, नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा रामपुरी आणि इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!