राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त केवडिया येथील एकता परेडचा अनुभव घेण्याची गडचिरोली जिल्ह्यातील ५० नागरिकांना संधी !

0
IMG-20261027-WA0231
Spread the love

प्रेस नोट

 

• अतिदुर्गम भागातील 50 नागरिकांना एकता परेड प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी; पोलीस अधीक्षक यांनी संवाद साधत सहभागी नागरिकांचे केले अभिनंदन

• एकता दिन परेडमध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या 200 सी-60 कमांडोंचा सहभाग

गडचिरोली:-

गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता व विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने राष्ट्रीय एकात्मता, देशाची एकता व अखंडता यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुजरात राज्यातील एकतानगर (केवडिया) येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात आयोजित करण्यात येणा­या राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडचा अनुभव घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 50 नागरिकांना सदर एकता परेड प्रत्यक्ष पाहण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. तसेच परेडमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सी-60 पथकातील 200 जवानांचे पथक देखील सहभागी होणार आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणा­या राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्याने आयोजित या परेडच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता, राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा यांचा संदेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील 50 नागरिकांची एकता परेड प्रत्यक्ष पाहण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनाही या राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच या माध्यमातून देशाची सांस्कृतीक विविधता, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेचा संदेश अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
गडचिरोली जिल्हा हा दीर्घकाळ माओवादाच्या आव्हानाला सामोरा गेलेला जिल्हा असून, पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, सी-60 कमांडोंच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांमुळे आता गडचिरोली जिल्ह्राच्या अभिलेखावर एकही माओवाद शिल्लक नाही. गडचिरोली जिल्ह्यातील सी-60 कमांडोंनी माओवादविरोधी अभियानांमध्ये दाखविलेले धैर्य, शौर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा ही जिल्हा पोलीस दलाची अभिमानास्पद ओळख आहे. या जवानांचा राष्ट्रीय स्तरावरील एकता परेडमध्ये सहभाग ही गडचिरोली जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून, यामुळे जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांनी परेडमध्ये सहभागी 200 जवानांचे तसेच जिल्ह्यातील 50 नागरिकांचे अभिनंदन केले असून केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या परेड व कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे, हा गडचिरोली जिल्हा पोलीस दलासाठी सन्मानाचा क्षण असल्याचे सांगितले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी स्वत: हजर होऊन सहभागी नागरिकांना मार्गदर्शन करत त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!