विनालायसन्स, विना हेल्मेट वाहन चालवू नका! देसाईगंज पोलिसांचे आमगावात वाहतूक नियमांबाबत जनजागृती!
Oplus_131072
अल्पवयीन मुलांच्या वाहन चालविण्यावर भर; ट्रिपल सीट वाहनचालकांनाही नियमांची जाणीव करून दिली

देसाईगंज : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमगाव गावाजवळ लाखांदूर मार्गावर वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विनालायसन्स वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, ट्रिपल सीट प्रवास करणे तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे यांसारख्या नियमभंगाच्या प्रकारांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गडचिरोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी शरद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.
वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न बसविणे आणि अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन न देणे, याबाबत पोलिसांनी नागरिकांना समजावून सांगितले. वाहतुकीचे नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या जनजागृती मोहिमेत सहायक पोलीस उपनिरीक्षक धोटे, पोलीस हवालदार झोडे, पोलीस अंमलदार हनवते आणि चालक पोलीस अंमलदार चापले यांनी सहभाग घेत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
नियमांचे पालन करा, अपघात टाळा! वाहतुकीबाबतची शिस्त प्रत्येक वाहनचालकाने अंगीकारल्यास रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

