आठ वर्षांपासून रखडलेल्या सुद्धागुडम-मरपल्ली रस्त्यासाठी हजारोंचा एल्गार.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

उमानूर चौकात चक्काजाम; निधी मिळताच काम सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन

गडचिरोली : अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागातील सुद्धागुडम-मरपल्ली रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात अखेर ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर आला. तब्बल आठ वर्षांपासून रस्ता मंजूर होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी (५ ऑक्टोबर) उमानूर मेन रोड चौकात हजारो नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

सुद्धागुडम, मरपल्ली, रेगुलवाही, करंचा, उमानूरसह परिसरातील १५ ते २० गावांतील आदिवासी नागरिक, महिला, युवक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

रस्त्याअभावी दळणवळणाचा प्रश्न गंभीर

सुद्धागुडम-मरपल्ली मार्गाची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चिखल, दलदल आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गरोदर महिला, रुग्ण, विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

रस्त्याबरोबरच परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्कचा अभाव आणि करंचा व रेगुलवाही येथील नाल्यांवरील जीर्ण पुलियांचा प्रश्नही आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला.

रस्ता खराब असल्याने शेतमाल बाजारपेठेत पोहोचविताना शेतकऱ्यांना अडचणी येतात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात वेळेत नेणेही आव्हानात्मक ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष काम सुरू करा’

आंदोलनाला संबोधित करताना डॉ. अजय कंकडालवार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेला रस्ता अद्याप प्रत्यक्षात आला नसल्याने हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून आदिवासीबहुल भागातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

“ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी पाठपुरावा केला आहे. आता केवळ आश्वासनांवर समाधान मानले जाणार नाही. प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा इशारा कंकडालवार यांनी दिला.

निधी मिळताच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती स्पष्ट केली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुद्धागुडम-मरपल्ली रस्त्याची पुनर्निविदा १२ फेब्रुवारी २०२६ रोजी काढण्यात आली असून तांत्रिक छाननी पूर्ण झाली आहे. मात्र निधीअभावी आर्थिक लिफाफा उघडण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. निधीसाठी १८ मार्च २०२६ रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

निधी उपलब्ध होताच, तसेच पुढील दोन ते तीन महिन्यांत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. याशिवाय मरपल्ली-रेगुलवाही मार्गावरील पॅचवर्कचे काम दिवाळीनंतर नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली.

आश्वासनाची अंमलबजावणी कधी?

आंदोलनाला परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना आणि महिला बचत गटांनी पाठिंबा दिला.

आंदोलन शांततेत पार पडले असले तरी आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेले आश्वासन प्रत्यक्ष कामात कधी रूपांतरित होते, याकडे सुद्धागुडम-मरपल्ली परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आठ वर्षांची प्रतीक्षा संपणार की पुन्हा आश्वासनांचीच पुनरावृत्ती होणार, याचे उत्तर आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!