आष्टीत प्रस्तावित बेमुदत उपोषणाला नागरिकांचा विरोध; परवानगी नाकारण्याची तहसीलदारांकडे मागणी.
आष्टी : सुरजागड प्रकल्पाच्या वाहतुकीच्या प्रश्नावरून

आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनकडून १ ऑक्टोबर २०२६ पासून आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आष्टीतील नागरिकांनी या आंदोलनाला विरोध दर्शविला आहे. याबाबत तहसीलदार, चामोर्शी यांच्याकडे निवेदन देऊन प्रस्तावित आंदोलनास परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, संबंधित संघटना अहेरी तालुक्यातील असून त्यांच्या मागण्या व आंदोलन त्यांच्या कार्यक्षेत्रातच करण्यात यावे, अशी नागरिकांची भूमिका आहे. आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा नागरिकांची मोठी वर्दळ असलेला तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर आहे. या ठिकाणी बेमुदत उपोषण किंवा आंदोलन झाल्यास वाहतूक कोंडी, नागरिकांच्या दैनंदिन क परिणाम तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनास परवानगी दिल्यास आष्टीतील नागरिकांना आपल्या परिसरातील शांतता, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रस्तावित आंदोलनास परवानगी नाकारावी, आंदोलन करायचे असल्यास संबंधित संघटनेने अहेरी तालुक्यात करावे आणि आष्टीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे.
