गडचिरोलीचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व बोनस द्या — खासदार डॉ. नामदेव किरसान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

0
IMG-20260924-WA0227
Spread the love

 

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने योग्य ती नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी. तसेच पात्र शेतकऱ्यांना बोनसची रक्कम तत्काळ अदा करावी, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गडचिरोली जिल्हा प्रामुख्याने कृषी आधारित असून बहुतांश शेतकरी खरीप हंगामातील धान, सोयाबीन, कापूस तसेच अन्य पिकांच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. यंदा मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे पर्जन्यमानात मोठी तफावत राहिल्याने अनेक भागांत अपुरा व अनियमित पाऊस झाला. परिणामी खरीप पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

त्यातच विविध पिकांवर खोडकिडा व इतर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यातील पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करावेत. गडचिरोलीचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार नुकसानभरपाई व आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.

पात्र शेतकऱ्यांना बोनसची रक्कमही विलंब न करता अदा करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!