जातनिहाय जनगणनेत अचूक व वैज्ञानिक वर्गीकरणाची मागणी; ओबीसी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
गडचिरोली:-

आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय अचूक व प्रमाणित माहिती संकलित करण्यात यावी, तसेच जात-कोडिंगची प्रमाणित पद्धत, स्वतंत्र O.B.C. प्रवर्ग आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित जात वर्गीकरणाचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे मा. जिल्हाधिकारी साहेबांना महेंद्र ब्राह्मणवाडे व जिल्हाध्यक्ष ओबीसी काँग्रेस कमिटी गडचिरोली मनोज ढोरे यांच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.
जातनिहाय जनगणना ही सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विविध जाती व सामाजिक घटकांची लोकसंख्या, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोणत्या घटकांपर्यंत पोहोचत आहे, याबाबत अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यासाठी जनगणनेमध्ये जातनिहाय माहितीचे शास्त्रीय पद्धतीने संकलन होणे आवश्यक आहे.
यासाठी प्रत्येक जातीला प्रमाणित जात-कोड देण्यात यावा, O.B.C. समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग ठेवण्यात यावा तसेच जात वर्गीकरणासाठी वैज्ञानिक व एकसमान पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. उपलब्ध होणारी आकडेवारी भविष्यातील सामाजिक न्याय, आरक्षण, शैक्षणिक सुविधा, रोजगार, कल्याणकारी योजना आणि इतर धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरावी, यासाठी जनगणना प्रक्रिया पारदर्शक व अचूक असणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
या मागण्यांचा शासनस्तरावर सकारात्मक विचार करून आगामी जनगणनेमध्ये आवश्यक त्या सुधारणा व योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, राष्ट्रीय समन्वयक आदिवासी काँग्रेस कुसुमताई आलाम, जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली माधव गावड,श्रीकांत देशमुख नगरसेवक,पराग पोरेड्डीवार नगरसेवक, गजानन नैताम,कुणाल पेंडुरकर,कविता मोहरकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी धानोरा प्रशांत कोराम, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, हरबाजी मोरे, लालाजी सातपुते, विजय लाड,स्वप्नील बेहरे, वंदना बरसागडे, रवींद्र चलाख, निकेश कामिडवार, आशिष घेर, लंकेश जेंगठे, विजय राऊत, पुरषोत्तम भाऊ, विलास चिचघरे, सुशील शहा, भूषण भैसारे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

