गणेशोत्सव मंडळांसाठी चामोर्शी पोलिसांचा नियमावलीचा ‘अलर्ट’; नियमभंग टाळण्याचे आवाहन.
Oplus_131072
ध्वनीप्रदूषण, मद्यविक्री, वाहतूक व अग्निसुरक्षेसह सामाजिक सलोख्याबाबत पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना

चामोर्शी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी चामोर्शी पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांसाठी विविध महत्त्वपूर्ण नियम व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. “गणराया सर्वांचा, उत्सव आपला” या भावनेतून मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार, रात्री १० वाजल्यानंतर डीजे, ढोल-ताशा अथवा ध्वनिवर्धक वाजवू नयेत, तसेच शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे. मंडळ परिसरात दारूची विक्री, सेवन किंवा मद्यपानास पूर्णपणे प्रतिबंध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मंडप परिसरात वाहतुकीला अडथळा नको
गणेश मंडप उभारताना तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची मंडळांनी दक्षता घ्यावी. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मिरवणूक मार्गावर शिस्त राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही, प्रकाशव्यवस्था आणि संशयितांवर नजर
मंडळांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवावी. गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अग्निसुरक्षेकडे विशेष लक्ष
मंडपातील विद्युत वायरिंग, रोषणाई आणि फटाक्यांच्या वापरात विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाद टाळा; सामाजिक सलोखा जपा
गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा उत्सव असल्याने मंडळांनी कोणत्याही प्रकारचे भांडण, वाद किंवा अनुचित प्रकार टाळावेत. सर्व धर्मीयांचा सन्मान राखून सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
तसेच मंडप परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“स्वच्छ गणेशोत्सव, सुरक्षित गणेशोत्सव” या संकल्पनेतून नागरिकांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. उत्सव आनंददायी असला तरी तो कायद्याच्या चौकटीत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस स्टेशन चामोर्शी यांनी केले आहे

