गडचिरोलीच्या १८ कलाकारांची राष्ट्रीय भरारी; पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव
Oplus_131072
रेला नृत्यातून दिल्लीच्या मंचावर गडचिरोलीची आदिवासी अस्मिता
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसह १८ कलाकारांचे दमदार सादरीकरण; ‘प्रोजेक्ट उडान’मधून शांतता व परिवर्तनाचा संदेश
गडचिरोली, दि. ९ : अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख मागे सारत गडचिरोलीच्या आदिवासी संस्कृतीने देशाच्या राजधानीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिल्ली येथे आयोजित ९व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडंट फेस्टिव्हलमध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी पारंपरिक ‘रेला’ नृत्य सादर करून जिल्ह्याच्या समृद्ध लोककलेचे प्रभावी दर्शन घडविले.

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत चार आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसह ‘अनुप डान्स ग्रुप’च्या १४ युवक-युवती अशा एकूण १८ कलाकारांनी या महोत्सवात सहभाग घेतला. पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर केलेल्या रेला नृत्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सादरीकरणातून गडचिरोलीची आदिवासी लोकपरंपरा, कला, संस्कृती आणि अस्मिता राष्ट्रीय पातळीवर पोहोचली.
कलेच्या माध्यमातून परिवर्तनाचा संदेश
या सहभागाचे महत्त्व केवळ सांस्कृतिक सादरीकरणापुरते मर्यादित राहिले नाही. हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित सदस्यांना कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून नव्या आयुष्याची दिशा देण्याचा प्रयत्न ‘प्रोजेक्ट उडान’मधून केला जात आहे. दिल्लीसारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या पारंपरिक कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणे हा या कलाकारांसाठी विशेष अनुभव ठरला.
पोलीस अधीक्षकांच्या हस्ते कलाकारांचा गौरव
दि. ८ सप्टेंबर रोजी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट सहभागाबद्दल कलाकारांना रोख बक्षीस देऊन प्रोत्साहनही देण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कलाकारांचे अभिनंदन करताना, “हे सादरीकरण केवळ नृत्य नसून गडचिरोलीच्या परिवर्तनाची, शांततेची आणि नव्या आशेची ओळख आहे,” असे गौरवोद्गार काढले.
आत्मसमर्पित सदस्यांना नवी वाट
एकेकाळी हिंसेच्या मार्गावर गेलेल्या आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेशी जोडले जात आहे. दिल्लीतील सादरीकरणामुळे या सदस्यांना स्वतःच्या पारंपरिक कलेचे राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करण्याची संधी मिळाली.
या संधीबद्दल आत्मसमर्पित सदस्यांनी गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले. गडचिरोलीच्या मातीत रुजलेली ‘रेला’ची कला दिल्लीच्या मंचावर पोहोचणे हा केवळ सांस्कृतिक गौरव नसून शांतता, सामाजिक सलोखा आणि परिवर्तनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाचे प्रतीक ठरले आहे.

