दुर्गम वांगेपल्लीचा मोहन राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत चमकला; कांस्यपदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र.
ताओलू–नानगुन प्रकारात दमदार कामगिरी; शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक
गडचिरोली, दि. ९ सप्टेंबर : पुणे येथे आयोजित २४ व्या राज्यस्तरीय ज्युनियर वुशू स्पर्धा–२०२६ मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी मोहन मलया कोंडागोरला याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले. वुशूच्या ताओलू–नानगुन प्रकारात मोहनने ही कामगिरी केली असून, या यशामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अतिदुर्गम व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याने राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत पदक मिळवत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात या यशाची विशेष दखल घेतली जात आहे. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मोहनने राज्यस्तरीय स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध केली.
मोहनच्या या कामगिरीमुळे तो क्रीडा क्षेत्रातील ५ टक्के आरक्षणासाठी आवश्यक पात्रतेच्या अनुषंगानेही पात्र ठरला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे. त्याच्या यशामध्ये प्रशिक्षक यश पडेलवार यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांनी मोहनच्या तांत्रिक प्रशिक्षणासोबतच नियमित सरावावर विशेष भर दिला.
मोहनच्या यशाबद्दल समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी आणि सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी त्याचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
१०० हून अधिक विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर पोहोचविण्याचे उद्दिष्ट
शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना योग्य संधी मिळावी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत जिल्हा व राज्यस्तरावर यश मिळवावे, यासाठी समाज कल्याण विभागाकडून यंदा विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांचा नियमित सराव व प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
यावर्षी जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमधील १०० हून अधिक विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट समाज कल्याण विभागाने ठेवले आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यावर विभागाचा भर आहे.
वांगेपल्लीसारख्या दुर्गम भागातील शासकीय निवासी शाळेतील मोहनने वुशू या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय कांस्यपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविल्याने समाज कल्याण विभागाच्या क्रीडा विकासाच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळाले असल्याचे डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.
