सोशल मीडियावरील व्हिडिओची आमदारांकडून तात्काळ दखल; मंगेवाडा टोल्यात पुलासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

धानोरा | प्रतिनिधी
मंगेवाडा टोला येथील नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर आमदार रामदासजी मसराम यांनी या समस्येची तात्काळ दखल घेत थेट घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आमदारांच्या या तत्पर भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगेवाडा टोला येथे नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांसह रुग्ण, गर्भवती महिला, वृद्ध आणि इतर ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर नाला ओलांडणे धोकादायक ठरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी आमदार मसराम यांना दिली.

अभियंत्यांना तातडीच्या सूचना

घटनास्थळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आमदार रामदासजी मसराम यांनी संबंधित अभियंत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच कामाला विलंब होऊ नये यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
नाला ओलांडताना ग्रामस्थाचा मृत्यू; प्रश्नाची गंभीरता अधोरेखित
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी असताना सदाराम होळी या ग्रामस्थाचा नाला ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे मंगेवाडा टोला येथील पुलाचा प्रश्न केवळ विकासकामाचा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

रस्ता व पाणीटंचाईच्या समस्याही मांडल्या

पुलासोबतच रस्ता, पाणीटंचाई तसेच इतर मूलभूत सुविधांच्या समस्या ग्रामस्थांनी आमदारांसमोर मांडल्या. आमदारांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित समस्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामस्थांनी भावनिक होत, “आमच्या गावात पहिल्यांदाच आम्ही आमदार बघितला,” अशी भावना व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर मंगेवाडा टोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणारे पहिले आमदार म्हणून रामदास मसराम यांचा उल्लेखही ग्रामस्थांनी केला.

पूल होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील”

सोशल मीडियावर समस्या समोर आल्यानंतर केवळ प्रतिक्रिया न देता थेट घटनास्थळी पोहोचून पाहणी करणे आणि पुलाच्या कामासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देणे, यामुळे आमदार मसराम यांच्या भूमिकेची चर्चा होत आहे.
“ग्रामस्थांची समस्या हीच माझी समस्या आहे. मंगेवाडा टोला येथे पूल होईपर्यंत आवश्यक तो पाठपुरावा सुरूच राहील,” असे आमदार रामदास मसराम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, कमलेश बारस्कर, श्रीकांत कुमरे, सुधाकर तुलावी, श्रावण नरोटे, रामसिंग हरामी, अनिल नरोटे, सुधाकर होळी, शामराव होळी, सन्नू नरोटे, दशरथ गावडे, आसाराम होळी, भजनराव मडावी, वर्षा कुमरे, लक्ष्मी होळी, संतो मडावी, सुनीता नरोटे, सौ. जयवंता मडावी, सौ. निर्मला होळी, सीता होळी, जुनाय कुमोटी, रसिका होळी, हिराबाई हरामी, वचलाबाई होळी, सरजाबाई मडावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!