पीपली-बुर्गीतील प्रस्तावित कंपनी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; राजे अम्ब्रिशराव आत्रामांकडे न्यायाची मागणी, प्रशासनालाही निवेदन.

आर्थिक प्रलोभन व दिशाभूल करून ग्रामसभेचा ठराव मिळविल्याचा आरोप; कंपनी, प्रशासन आणि बाधित गावकऱ्यांची संयुक्त खुली बैठक घेण्याची मागणी
एटापल्ली | प्रतिनिधी :
एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत पीपली (बुर्गी) परिसरात प्रस्तावित ‘ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या प्रकल्पावरून ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रकल्पाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रभावित गावांच्या अटी-शर्ती मान्य करून खुली व पारदर्शक चर्चा घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पीपली, बुर्गी, जवेली खुर्द, जिजावंडी, वेलमागड आदी परिसरातील ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेत निवेदन सादर केले. प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दिशाभूल करून ग्रामसभेचा ठराव मिळविल्याचा आरोप
कंपनीच्या प्रस्तावासाठी आवश्यक ग्रामसभेचा ठराव मिळविताना काही मोजक्या व्यक्तींमार्फत ग्रामस्थांना आर्थिक प्रलोभने दाखवून तसेच दिशाभूल करून फसवणूक केली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. याबाबत एटापल्ली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री आणि गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडेही सविस्तर निवेदन सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
रोजगार, पर्यावरण आणि शेतजमिनीबाबत अटींची मागणी
प्रस्तावित प्रकल्पामुळे पीपली, बुर्गी, जवेली खुर्द, जिजावंडी, वेलमागड यासह परिसरातील अनेक गावांवर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, पर्यावरणाचे संरक्षण, शेतजमीन व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन तसेच परिसराचा सर्वांगीण विकास याबाबत स्पष्ट अटी निश्चित करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
कंपनी-प्रशासन-ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि बाधित गावांतील नागरिकांची संयुक्त खुली बैठक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्व संबंधित मुद्द्यांवर पारदर्शकपणे चर्चा करून ग्रामस्थांच्या संमतीनेच पुढील निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘न्याय्य हक्कांसाठी ग्रामस्थांच्या पाठीशी’
ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्थानिक जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. प्रभावित नागरिकांच्या मागण्या कंपनीकडून मान्य करून घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या भेटीमुळे ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या असून, आता प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन याप्रकरणी कोणती भूमिका घेतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
यावेळी सचिन लेकामी, पुरुषोत्तम हेडो, दिलीप लेकामी, नानसू हिचामी, पेका लेकामी, मधुकर मट्टामी, संदीप लेकामी, भिवा पदा, रणजित लेकामी, प्रवीण लेकामी, अजित नरोटे, विनोद पदा, अब्बू नरोटे, गणेश नरोटे, सत्तू तुमरेट्टी, सदाशिव तुमरेट्टी, मंगेश नरोटे, किशोर नरोटे, नागेश गोटा, नरेश दुर्वा, नितेश गोटा यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
