गडचिरोलीत इंडियन ओव्हरसीज बँकेची पहिली शाखा सुरू; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन
Oplus_131072
झाशी राणी नगरात नव्या शाखेचा शुभारंभ; नागरिकांसह व्यापारी, उद्योजक व शेतकऱ्यांना आधुनिक बँकिंग सुविधांचा लाभ
जिल्हा प्रतिनिधी | गडचिरोली : गडचिरोली शहरातील झाशी राणी नगर येथे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (IOB) गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या शाखेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन झाले.

गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा सुरू झाल्याने नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ बँकिंग सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. विशेषतः व्यापारी, उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य खातेदारांसाठी विविध आर्थिक सेवा अधिक सहज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नव्या शाखेच्या प्रारंभाबद्दल आनंद व्यक्त केला. “जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी सक्षम बँकिंग व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. IOBच्या या शाखेमुळे नागरिकांच्या आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण होण्यास मदत होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या शाखेमुळे स्थानिक पातळीवरील आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यासोबतच व्यापार, उद्योग आणि विविध व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. डिजिटल बँकिंगसह आधुनिक आर्थिक सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याने जिल्ह्याच्या बँकिंग क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण विस्तार मानला जात आहे.
उद्घाटन सोहळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा शहर महामंत्री तथा नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर, कृषी अधिकारी प्रीती हिरडकर, IOBचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक प्रदीपकुमार शहा, मुख्य प्रबंधक सवाईसिंगजी मीना, डॉ. किशोर वैद्य, डॉ. प्रीतीताई वैद्य यांच्यासह बँकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर्थिक विकासाला मिळणार नवी चालना
गडचिरोलीत IOBची पहिली शाखा सुरू झाल्याने जिल्ह्यातील बँकिंग सेवांचा विस्तार झाला असून, नागरिकांना विविध आर्थिक सुविधा अधिक जवळून मिळणार आहेत. या शाखेमुळे गडचिरोलीच्या आर्थिक वाटचालीला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
