विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ : रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवडीची मागणी; माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुतर्फा नियोजनबद्ध पद्धतीने बहुउपयोगी वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना.  शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
“विकसित गडचिरोली व्हिजन २०४७” या संकल्पनेत पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व नागरिकांच्या उत्पन्नवाढीला महत्त्व देण्यात आले आहे. या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील PWD अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक हवामान व मातीला अनुकूल असलेल्या बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्याची मागणी डॉ. होळी यांनी केली आहे.
यामध्ये आंबा, चिंच, मोह, ताड, कडुलिंब, वड, पिंपळ, आवळा, निलगिरी, चिकू, बदाम आदी उपयोगी वृक्षांचा समावेश करण्यात यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या वृक्षलागवडीमुळे रस्त्यांचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संवर्धन, तापमान नियंत्रण व जैवविविधतेच्या संरक्षणास मदत होईल. भविष्यात फळे, बिया, फुले व इतर वनउपजांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते.
लागवड केलेल्या वृक्षांचे संरक्षण व संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट व युवक मंडळांच्या माध्यमातून निश्चित करण्यात यावी, अशी सूचनाही माजी आमदार डॉ. होळी यांनी केली आहे. त्यामुळे वृक्षलागवड केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता त्यांचे दीर्घकालीन संवर्धन होण्यास मदत होईल.
गडचिरोली जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि रोजगार या दोन्ही बाबींचा समन्वय साधणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे “विकसित गडचिरोली व्हिजन २०४७” अंतर्गत PWD रस्त्यांच्या दुतर्फा बहुउपयोगी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा विशेष कार्यक्रम हाती घेऊन त्यासाठी आवश्यक निधी, नियोजन व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!