अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकास आणि पायाभूत कामांना गती; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
अहेरी : तालुक्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शिक्षण आणि शासकीय सेवा उपलब्ध करून देतानाच सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. अहेरी तालुक्याच्या दौऱ्यात त्यांनी विविध विभागांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा आढावा घेतला.
दौऱ्याची सुरुवात प्राणहिता पोलीस मुख्यालयापासून झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत प्रलंबित प्रकरणे, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि तालुकास्तरीय महसूल प्रकरणांची माहिती घेतली.
महिला व बाल रुग्णालयातील सुविधांचा आढावा
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करताना उपलब्ध आरोग्य सुविधा, मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रसामग्रीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. डॉक्टरांची काही पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले असून, ही पदे भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रुग्णालयातील रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऑडिट आणि विद्युत सुरक्षा ऑडिटची सद्यस्थितीही त्यांनी तपासली. अग्निसुरक्षेच्या उपाययोजना आणि सुरक्षा ऑडिटमधील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
पावसाळ्यात इमारतीच्या छताला होणारी गळती तसेच किरकोळ दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
रक्त संकलन युनिट सुरू करण्याला प्राधान्य
अहेरी रुग्णालयातील रक्त संकलन युनिटला प्रशासनाची मान्यता मिळाली असून ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक बाबींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. युनिट सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या युनिटमुळे अहेरीसह दुर्गम भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवर अधिक सक्षम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
आलापल्लीतील विकासकामांची पाहणी
आलापल्ली परिसरातील संरक्षण भिंत आणि नाला सरळीकरणाच्या कामांची पाहणी करून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. कामांचा दर्जा कायम ठेवून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर ताटीगुडम या ‘सेवा संपृक्त अभियाना’अंतर्गत निवडलेल्या गावाला भेट देत त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेतला. शैक्षणिक सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
कमलापूर हत्ती कॅम्प परिसरातील कामांना गती देण्याच्या सूचना
सायंकाळी कमलापूर हत्ती कॅम्प परिसराची पाहणी करताना कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे, पार्किंग व्यवस्था आणि परिसरातील इतर पायाभूत सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
दौऱ्याच्या अखेरीस विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून विकासकामांची प्रगती आणि नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवांचा आढावा घेण्यात आला. दुर्गम भागातील प्रलंबित कामांना गती देऊन शासनाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी दिले.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी अजय डोके, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी रमेश पेरगू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
