नागपंचमी व श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी.
Oplus_131072
नागपंचमी व श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी.
विशेष जिल्हाप्रतिनिधी : नागपंचमी आणि श्रावण महिन्याचा पहिला सोमवार या धार्मिक पर्वाच्या निमित्ताने आज, सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध शिवमंदिर (टेकडी) येथे भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.
पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. भगवान शिवशंकराच्या दर्शनासाठी तसेच नागपंचमीनिमित्त पूजा-अर्चा करण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमधून भाविक मंदिरात दाखल झाले. भाविकांनी भक्तिभावाने शिवलिंगाचे दर्शन घेत पूजा, अभिषेक व प्रार्थना केली.
श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने मंदिर परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शिस्त व शांतता राखत धार्मिक विधी पार पाडले.
