जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी २ नोव्हेंबरला समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन.
गडचिरोली, दि. २८ : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्तीसाठी सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे. अंतिम प्रतीक्षासूचीतील संबंधित उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

दि. ३१ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणांची तपासणी करून संपूर्ण माहिती असलेल्या १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षासूची तयार करण्यात आली आहे. ही सूची जिल्हा परिषदेच्या https://zpgadchiroli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रतीक्षासूचीतील गट-कच्या अनुक्रमांक १ ते १७६ आणि गट-डच्या अनुक्रमांक १ ते १६ पर्यंतच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. या उमेदवारांचे शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्तीसंबंधी समुपदेशन होणार आहे.
अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता आणि सामाजिक प्रवर्गानुसार उपलब्ध रिक्त पदांवर समुपदेशनाद्वारे पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
नियुक्तीसाठी कोणी पैशांची मागणी केल्यास किंवा नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याशी ९४०५२१७८७६ किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अनिकेत पाटील यांच्याशी ९७६७५०१५३० या भ्रमणध्वनी क्रमांकांवर थेट संपर्क साधावा, असे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.

