निरोगी जिल्हा, निरोगी गडचिरोली’ घडवण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे आवाहन.

0
IMG-20261027-WA0202
Spread the love

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटगल येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे जिल्हास्तरीय उद्घाटन संपन्न

 

​ मान्यवर अधिकाऱ्यांनी स्वतः जंतनाशक गोळी घेऊन वाढवला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास

​गडचिरोली 27:-राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल येथे जिल्हास्तरीय मोहिमेचे शानदार उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, शिक्षणाधिकारी  प्रेरक उजागरे यांच्यासह आरोग्य व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
​कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि शिक्षकांनी स्वतः मुलांसमोर जंतनाशक गोळी (अल्बेंडाझोल) खाऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढवला.

​शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे म्हणाले, “मुलांचे आरोग्य सुदृढ राहिले तरच जिल्ह्याची प्रगती शक्य आहे. ‘निरोगी जिल्हा, निरोगी गडचिरोली’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि नियमितपणे जंतनाशक गोळी घेणे गरजेचे आहे.”

​याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी पोटात जंत झाल्यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा, कुपोषण आणि रक्ताची कमतरता (ॲनिमिया) कशी निर्माण होते, याविषयी माहिती देत जंतांपासून बचावासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.

​जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके यांनी मोहिमेच्या नियोजनाविषयी माहिती दिली. मोहिमेच्या दिवशी काही कारणास्तव गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या किंवा गैरहजर राहिलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी ‘मॉप-अप राउंड’ (Mop-up Round) राबवण्यात येणार असून, त्या दिवशी सर्व उर्वरित बालकांना जंतनाशक गोळी देऊन सुरक्षित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

​या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, पाथ फाउंडेशनच्या प्रतिनिधी श्रुष्टी पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेश चिल्लमवार, पदवीधर शिक्षक श्री. भास्कर कुद्रपवार, शिक्षक श्री. तुकाराम कोसरे आदी शिक्षकवृंद व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!