लोकशाहीच्या रक्षणासाठी गडचिरोली-चंद्रपूरचे शेकडो काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीला जाणार.
‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोलीत बैठक; महेंद्र ब्राह्मणवाडे यांची उपस्थिती

गडचिरोली : देशातील लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मतदारांच्या अधिकारांचे संवर्धन आणि कथित मतचोरीविरोधात आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘व्होट बचाव, देश बचाव – चलो दिल्ली’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीला महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण हे आंदोलनाचे प्रमुख मुद्दे असणार आहेत.
यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, देशातील लोकशाही मूल्ये अबाधित राहावीत आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण व्हावे, यासाठी राहुलजी गांधी सातत्याने लढा देत आहेत. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मताला महत्त्व असून, मतदारांच्या अधिकारांशी कोणत्याही प्रकारे तडजोड होता कामा नये. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांबाबत जबाबदारी निश्चित करून लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखणे आवश्यक आहे.
राहुलजी गांधी यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी तसेच लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वासही ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला.
या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग, तालुकास्तरावर जनजागृती आणि दिल्लीतील आंदोलनासाठी आवश्यक नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहनही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.
यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

