चामोर्शीत लोडशेडिंगविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; १६ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलनाचा इशारा!

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी रस्त्यावर; भातपीक वाचविण्यासाठी १२ तास वीजपुरवठ्याची मागणी

चामोर्शी, दि. १३ ऑक्टोबर : पावसाने ओढ दिल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता वीज भारनियमनाचे नवे संकट उभे ठाकले आहे. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे भातपिके करपण्याची भीती निर्माण झाल्याने चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप सोमवारी रस्त्यावर उतरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि महिलांनी चामोर्शी बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करीत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कृषीपंपांसाठी नियमित १२ तास वीजपुरवठा सुरू करावा, लोडशेडिंग बंद करावे आणि शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

अपुऱ्या वीजपुरवठ्याने शेती संकटात

चामोर्शी तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भातासह कापूस व इतर पिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या माध्यमातून सिंचन करावे लागत असताना महावितरणच्या भारनियमनामुळे पाणी देणेही कठीण झाले आहे.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी आठ तास असलेले भारनियमन वाढवून १२ तास करण्यात आले आहे. त्यातच शेती आणि गावांचे वीज फीडर विभक्त करण्याचे काम सुरू असल्याने वीजपुरवठ्यात आणखी व्यत्यय येत आहे. परिणामी, प्रत्यक्षात केवळ तीन ते चार तास वीज मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

कर्ज काढून, उसनवारी करून आणि मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, वेळेवर वीज मिळत नसल्याने सिंचन करणे अशक्य होत असून, हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोडशेडिंगमुक्त जिल्ह्यात भारनियमन कशासाठी?

दिवंगत आर. आर. पाटील पालकमंत्री असताना गडचिरोली जिल्हा लोडशेडिंगमुक्त ठेवण्यात आला होता, अशी आठवण करून देत आंदोलकांनी सध्याच्या भारनियमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्वी लोडशेडिंगमुक्त असलेल्या जिल्ह्यात आज शेतकऱ्यांना अपुऱ्या वीजपुरवठ्याचा सामना का करावा लागत आहे, असा सवाल त्यांनी केला.

फीडर विभक्तीकरणाचे काम सुरू असले तरी त्याचा फटका शेतीला बसू नये. हे काम एक महिना स्थगित ठेवून शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अधिकाऱ्यांचे आश्वासन; शेतकऱ्यांना दोन दिवसांची मुदत

चक्काजाम आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार प्रशांत घोरुडे, महावितरणचे उपविभागीय अभियंता रमाकांत देवगडे आणि पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले.

महावितरणचे उपविभागीय अभियंता रमाकांत देवगडे यांनी कृषीपंपांसाठी तातडीने १२ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत आश्वासन दिले. तसेच शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले.

मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

१६ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलनाचा इशारा

महावितरणने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलकांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत कृषीपंपांसाठी नियमित १२ तास वीजपुरवठा सुरू झाला नाही, तर १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अतुल गण्यारपवार यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न हा त्यांच्या उपजीविकेशी निगडित आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

चक्काजाममध्येही माणुसकीचे दर्शन

आंदोलनादरम्यान वाहतूक विस्कळीत होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चक्काजाममुळे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आंदोलकांनी चिवडा आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. आंदोलनाच्या धामधुमीतही प्रवाशांची काळजी घेत शेतकऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.

या आंदोलनात उपसभापती प्रेमानंद मल्लिक, सुरेश परसोडे, सुधाकर गदे, करण गण्यारपवार, अमोल (नाना) गण्यारपवार, मधुकर चिंतलवार, राजू आत्राम, गोसाई सातपुते, सुधाकर निखाडे, शामराव पोरटे, पंचरंग मडल, जुगल बारई, रमेश भसारकर, विनोद शेंगर, पंकज दहेलकर, गुरुदास चौधरी, खोजेंद्र सातपुते, सुनील आभारे यांच्यासह तालुक्यातील हजारो महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले होते.

आता महावितरण दिलेल्या मुदतीत आश्वासनाची पूर्तता करणार की शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे संपूर्ण चामोर्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!