गडचिरोलीत १५ ऑक्टोबरला आरोग्य कर्मचाऱ्यांचा अमृतोत्सव व गुणवंत पाल्य गौरव सोहळा.
सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; नवनियुक्त आरोग्य सेविकांचे स्वागत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना, गडचिरोलीच्या वतीने सेवानिवृत्त आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका व आरोग्य विस्तार अधिकारी (पर्यवेक्षिका) यांचा अमृतोत्सव सत्कार सोहळा, गुणवंत पाल्य गौरव समारंभ तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ आणि नवनियुक्त आरोग्य सेविकांचा स्वागत सोहळा गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषद, गडचिरोली येथील वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्यात दीर्घकाळ आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून, एमबीबीएस, इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. तसेच सेवेत नव्याने रुजू झालेल्या आरोग्य सेविकांचे स्वागत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे राहतील.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोटुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि गावंडे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल हुलके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सचिन हेमके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. किरण शिंदे, जिल्हा पोलीस मुख्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल गोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पंकज हेमके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. माधव शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच मुख्य लेखा तथा वित्त विभाग अधिकारी वीरेंद्र चौधरी, जिल्हा प्रशिक्षण पथकाच्या डॉ. रुचिता खंडारे, जिल्हा व्यवस्थापन कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल थिंगडे, प्रशासकीय अधिकारी शंतनू पाटील, अधीक्षक कनोजिया, नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य मेघा कुलसंगे आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका रेखा निग्गुट यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि नव्याने सेवेत दाखल झालेल्या आरोग्य सेविकांचे मनोबल वाढविणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा सौ. विमल अंबाडकर, सचिव सौ. मिनल वाळके तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

