गोंडवाना वैद्यकीय महाविद्यालय नामकरणासह जिल्ह्याच्या विकासातील विविध प्रश्नांवर फडणवीस यांच्याशी चर्चा.
Oplus_131072
गडचिरोलीतील उर्वरित १० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा; डॉ. देवराव होळींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली | प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन उर्वरित १० तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
नागपूर येथील रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत डॉ. होळी यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. यावेळी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ अंतर्गत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले.
गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली’ असे नामकरण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणीही डॉ. होळी यांनी केली. गडचिरोलीची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आदिवासी ओळख लक्षात घेता या नामकरणामुळे जिल्ह्याच्या अस्मितेला अधोरेखित करता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित १० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने केवळ कागदोपत्री निकष न पाहता प्रत्यक्ष पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची पाहणी करून संबंधित तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणाऱ्या सवलती, मदत आणि आवश्यक उपाययोजनांचा लाभ शेतकरी व नागरिकांना मिळावा, यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी केली.
गडचिरोलीच्या विकासासाठी आरोग्य, कृषी, सिंचन व पाणीपुरवठा, रोजगार, शिक्षण तसेच आदिवासीबहुल भागातील मूलभूत सुविधा या क्षेत्रांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही डॉ. होळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

