वनहक्क पट्ट्यांच्या प्रलंबित प्रकरणांना गती द्या; बीआरएसपीचे(BRSP) धानोरा तहसीलदारांना निवेदन.
प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी; ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे घेण्याचे आश्वासन

धानोरा | प्रतिनिधी : धानोरा तालुक्यातील अनेक वर्षांपासून वनजमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे तातडीने वितरित करण्यात यावेत, या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी धानोरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
धानोरा तालुक्यातील पयडी, पैकीन, मुडझा, मुद्दा, मक्केपल्ली, मुस्का, निमगाव, बाकरुंडी यासह विविध गावांतील जवळपास ५० शेतकरी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वनहक्क पट्टे मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही अनेक प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने प्रलंबित प्रकरणांतील त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
वनहक्क पट्टा मिळाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे, शेतीसाठी आवश्यक सुविधा व साहित्य मिळविणे तसेच कृषी उत्पादन वाढविण्यास मदत होणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेत संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच उपग्रहाच्या माध्यमातून जमिनीवरील अतिक्रमणाची नोंद व पडताळणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही चर्चा झाली.
गावातील ७०, ८० तसेच ९० वर्षे वयोगटातील वृद्ध व्यक्तींकडून त्यांच्या जमिनीवरील अतिक्रमणाबाबत आवश्यक माहिती व पुरावे घेऊन पडताळणी करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. वनहक्क दाव्यांसाठी २००५ पूर्वीचा पुरावा, अधिकार अभिलेख, जुने दाखले तसेच उपलब्ध संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका पक्षाची राहील, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम रामटेके, तालुका सचिव चंद्रकांत रायपुरे, विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


