धानोरा मार्ग धुळीत! प्रशासन झोपलेय का? बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह —राहुल वैरागडे.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

काकाडयेली–धानोरा मार्गावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त; NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांची तातडीने पाणी मारण्याची मागणी

धानोरा : गडचिरोली–धानोरा मार्गावरील काकाडयेली ते धानोरा दरम्यान रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुले, महिला, वृद्ध तसेच वाहनचालकांना सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास यांसह विविध समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय रस्त्यालगतच्या शेतीतील पिकांवर धुळीचा थर साचत असल्याने पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धुळीचे प्रमाण वाढल्याने वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्टपणे दिसत नसून, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः मोठ्या वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिवसातून किमान चार वेळा पाणी मारण्याची मागणी
धुळीचा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभागाने रस्त्यावर दिवसातून किमान चार वेळा पाण्याचा मारा करावा, अशी मागणी NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केली आहे. रस्त्याची सद्यस्थिती लक्षात घेता बांधकाम विभागाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्षात उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“नागरिकांनी रस्त्यावरून प्रवास करायचा की खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असताना बांधकाम विभाग डोळे झाकून बसले आहे का?” असा संतप्त सवाल राहुल वैरागडे यांनी उपस्थित केला.
प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
काकाडयेली–धानोरा मार्गावरील धुळीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नियमित पाणी मारण्याची व्यवस्था करावी, तसेच रस्त्याची आवश्यक दुरुस्ती व देखभाल करावी, अशी मागणी राहुल वैरागडे यांनी केली आहे. नागरिकांचे आरोग्य आणि वाहनचालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!