रविंद्र चुनारकर यांची इंडोनेशियातील हवामान परिषदेसाठी निवड : ‘क्लायमेट इक्विटी’वर होणार मंथन.

0
IMG-20261001-WA0028
Spread the love

 

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील रविंद्र चुनारकर यांची इंटरटायडल लॅबच्या ‘क्लायमेट इक्विटी लॅब’ या आंतरराष्ट्रीय शिक्षण व नेतृत्व कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते इंडोनेशियात होणाऱ्या क्लायमेट इक्विटी कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहेत. भारत आणि इंडोनेशियातील समुदाय नेते, कार्यकर्ते, संशोधक आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या परिवर्तनकर्त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आणले जाणार आहे.

रविंद्र गेल्या दशकाहून अधिक काळ गडचिरोलीतील आदिवासी आणि जंगलावर अवलंबून असलेल्या समुदायांसोबत समुदाय विकास, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, उपजीविका तसेच सामाजिक आणि पर्यावरणीय न्यायाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू हा स्थानिक समुदायांचा सहभाग, नैसर्गिक संसाधनांवरील हक्क आणि स्थानिक पातळीवर शाश्वत विकासाला चालना देणे हा राहिला आहे.

या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हवामान बदल, लैंगिक समानता इत्यादी विषयांवर मंथन केले जाणार आहे. विशेषतः हवामान बदलाचा परिणाम समाजातील विविध घटकांवर कसा होतो आणि त्यामध्ये महिला व इतर आघाडीवरील समुदायांची भूमिका व अनुभव काय आहेत, यावर सहभागी अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत.

इंडोनेशियातील परिषदेदरम्यान विविध देशांतील कार्यकर्ते, संशोधक, संघटक आणि समुदाय नेत्यांसोबत अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर नऊ महिन्यांच्या या कार्यक्रमातून भविष्यातील सहकार्याच्या संधी आणि स्थानिक पातळीवर हवामान कृतीसाठी समुदाय-केंद्रित उपाय विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमातून मिळणारे ज्ञान, अनुभव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपर्कांचा उपयोग गडचिरोलीतील समुदायाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कामाला अधिक बळ देण्यासाठी करण्याचा चुनारकर यांचा मानस आहे. गडचिरोलीतील स्थानिक समुदायांचे अनुभव आणि त्यांचा हवामान बदलाशी सामना करण्याचा दृष्टिकोन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चेत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!