ठाकूरनगरच्या जंगलात वाघाचा हल्ला; इसम गंभीर जखमी.
बैल चारताना गणेश दास यांच्यावर अचानक झडप; चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

चामोर्शी : तालुक्यातील घोट परिसरालगत असलेल्या ठाकूरनगरच्या जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या ४८ वर्षीय गणेश खितीश दास यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दास गंभीर जखमी झाले असून, वाघाशी झालेल्या झुंजीत त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचविल्याची माहिती आहे.
हल्ल्यानंतर जखमी गणेश दास यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण किलनाके यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दास यांच्या कुटुंबीयांनी वन विभागाकडे नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, ठाकूरनगर परिसरातील जंगलात तीन ते चार वाघांचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सुमारे महिनाभरापूर्वी याच परिसरात एका बछड्यावर वाघाने हल्ला केल्याचेही ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात गस्त वाढवावी, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांना आवश्यक खबरदारीच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

