लाहेरीच्या तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार; ‘पीएम-जनमन’मधून मिळाला सुरक्षित निवारा.

0
IMG-20260924-WA0243
Spread the love

पीएम-जनमन’मधून मिळाला सुरक्षित निवारा; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सीईओ सुहास गाडे यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश.

 

गडचिरोली | प्रतिनिधी
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील तुलशी दस्सा पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न अखेर साकार झाले. ‘पीएम-जनमन’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना सुरक्षित निवारा मिळाला. ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी घराची पाहणी करून तुलशी पिडसे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने दिवा प्रज्वलित करून गृहप्रवेश करण्यात आला.
तुलशी पिडसे या माडिया गोंड समाजातील असून, आई व भावाच्या निधनानंतर त्यांचा कौटुंबिक आधार हरपला होता. अनेक वर्षे त्या छोट्याशा झोपडीत राहत होत्या. पावसाळ्यासह प्रतिकूल हवामानात त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
विशेष दुर्बल आदिवासी समूहातील कुटुंबांना मूलभूत सुविधा व सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पीएम-जनमन’ योजनेंतर्गत ग्रामपंचायत लाहेरीमार्फत सन २०२४-२५ मध्ये त्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता त्यांना पक्के घर मिळाले आहे.
दरम्यान, ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून दुर्गम भागातील योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी पंडा व मुख्य कार्यकारी अधिकारी गाडे यांनी लाहेरीला भेट देत घरकुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी लाभार्थीशी संवाद साधून योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया व नवीन घरामुळे झालेल्या बदलांची माहिती घेतली.
जिल्ह्यात ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी
‘पीएम-जनमन’अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विशेष दुर्बल आदिवासी समूहातील नागरिकांसाठी ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाकडून क्षेत्रीय स्तरावर आढावा घेण्यात येत आहे.
यावेळी भामरागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!