जिल्हा शल्यचिकित्सकपदी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची बीआरएसपीची मागणी(BRSP).

गडचिरोली, दि. २२ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार बाहेरील डॉक्टरांकडे न सोपविता, जिल्ह्यात दीर्घकाळ रुग्णसेवा केलेल्या अनुभवी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP), गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा तसेच छत्तीसगडमधूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात. दुर्गम भागातील या रुग्णांमध्ये माडिया, गोंडी, तेलगू, छत्तीसगडी, बंगाली आदी विविध भाषा बोलणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.
अशा परिस्थितीत जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक व आरोग्यविषयक परिस्थिती तसेच स्थानिक रुग्णांच्या अडचणींची माहिती असलेल्या अनुभवी डॉक्टरांकडे रुग्णालयाची जबाबदारी असणे महत्त्वाचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात किंवा जिल्हा रुग्णालयात मागील १२ ते १५ वर्षांपासून रुग्णसेवेत सक्रिय असलेल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महिला रुग्णालयांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियमित सेवा देण्याची मागणी
गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयाशी जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालय जोडलेले असल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक व डॉक्टरांची टीम गडचिरोली महिला रुग्णालयात नियमित रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही बीआरएसपीने केली आहे.
तसेच गडचिरोली महिला रुग्णालयात कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांची अहेरी येथील महिला रुग्णालयात नियमित सेवेसाठी नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून दक्षिण गडचिरोलीतील महिला व बालकांना आवश्यक तज्ज्ञ उपचार वेळेत मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
महिला व बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी मिलिंद बांबोळे यांनी केली आहे.


