समाज भवनाच्या प्रवेशमार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर; नोटीसनंतरही अतिक्रमण कायम, कठोर कारवाईचे संकेत.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

चामोर्शी : तालुक्यातील गट ग्रामपंचायत मारोडा अंतर्गत येणाऱ्या भोगनबोडी हेट्टी येथे शासकीय समाज भवनाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवेशमार्गासमोर अतिक्रमण झाल्याने सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
भोगनबोडी हेट्टी येथील समाज भवनाचा वापर विविध शासकीय, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी केला जातो. मात्र, भवनाच्या प्रवेशमार्गालगत अतिक्रमण झाल्याने मार्ग अरुंद झाला असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत असून, सार्वजनिक जागेचा वापर सुरळीत होण्यासाठी प्रवेशमार्ग मोकळा ठेवण्याची मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी याप्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणाची वस्तुस्थिती तपासावी आणि नियमबाह्य अतिक्रमण असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नोटीस देऊनही अतिक्रमण कायम
याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, समाज भवनाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तीला ग्रामसभेच्या माध्यमातून कारवाईची नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही संबंधित व्यक्तीने अद्याप अतिक्रमण हटविलेले नाही.
कठोर कारवाई करण्यात येईल : ग्रामपंचायत प्रशासन
“समाज भवनाच्या जागेवर ज्या व्यक्तीने अतिक्रमण केले आहे, त्याला आमसभा घेऊन कारवाईची नोटीस देण्यात आली आहे. तरीही संबंधित व्यक्तीने अतिक्रमण हटविलेले नाही. आता त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,” अशी भूमिका ग्रामपंचायत प्रशासनाने स्पष्ट केली आहे.
दरम्यान, सार्वजनिक वापराच्या समाज भवनाचा प्रवेशमार्ग मोकळा करून अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुढील कारवाई कधी केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!