प्रदेशाध्यक्ष नरेंद्र उंदिरवाडे यांच्या हस्ते आवाज जनतेचा या न्युज पोर्टलचे उद्घाटन; पत्रकारिता क्षेत्रातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा संकल्प.
चामोर्शी, दि. १३ ऑगस्ट :

जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देत सत्य, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘आवाज जनतेचा 24×7’ या न्यूज पोर्टलचा दिमाखदार शुभारंभ अनुसूचित जाती व जनजाती विकास परिषद, नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र उंदिरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी अनुसूचित जाती व जनजाती विकास परिषदेचे महाराष्ट्र सचिव अमोल पी. कुडमेथे, ‘आवाज जनतेचा’चे तालुका अध्यक्ष शुभम वनकर, पोर्टलचे मुख्य संपादक सोनू वाळके, तसेच सुनील तुरे, देवानंद बोरकर, सत्यविजय रामटेके , हेमंत रामटेके आणि लोकमतचे भेंडाळा प्रतिनिधी रोशन थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘आवाज जनतेचा’ या नव्या डिजिटल व्यासपीठाला शुभेच्छा देत ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, आदिवासी समाज तसेच वंचित घटकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली. “पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, समस्या आणि जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘आवाज जनतेचा 24×7’ हे पोर्टल आगामी काळात स्थानिक घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, राजकीय आणि जनहिताच्या विविध प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांचा आवाज डिजिटल माध्यमातून अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करणार आहे. शुभारंभ सोहळ्यामुळे पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ‘आवाज जनतेचा’ला शुभेच्छांचा वर्षाव होत असून, “जनतेचा प्रश्न, जनतेचा आवाज आणि जनतेसाठीची निर्भीड पत्रकारिता” ही भूमिका घेऊन नव्या पोर्टलची वाटचाल सुरू झाली आहे.

