राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम: २७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २.५६ लाख बालकांना दिली जाणार जंतनाशक गोळी.

0
IMG-20261024-WA0187
Spread the love

 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठक संपन्न

गडचिरोली जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालके व मुला-मुलींच्या उत्तम आरोग्यासाठी, पोषणस्थिती सुधारण्यासाठी आणि जंतसंसर्गापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ मोहीम राबविण्यात येत आहे, तसेच सुटलेल्या बालकांसाठी ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘मॉप-अप दिन’ आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आज, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली दुरभाष्य प्रणाली द्वारे जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा व प्रशिक्षण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आदिवासी प्रकल्प विभाग आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

*मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये व आकडेवारी:*
* एकूण पात्र लाभार्थी: जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील एकूण २,५६,७६२ बालके व किशोरवयीन मुले-मुली।
* १ ते ६ वर्षे (अंगणवाडीतील बालके): १,०३,७६८
* ६ ते १० वर्षे वयोगट: ५४,४८७
* १० ते १९ वर्षे वयोगट: ९८,५०७
* एकूण बुथ संख्या: जिल्ह्यातील ३,८५३ बुथवर (२,३२८ अंगणवाडी केंद्र + १,७२७ शाळा) ही मोहीम राबविली जाईल।
* कार्यरत मनुष्यबळ: एकूण ६,०६४ कर्मचारी (२,०२९ नोडल शिक्षक, १,७०७ आशा स्वयंसेविका आणि २,३२८ अंगणवाडी सेविका).

तसेच या मोहिमेसाठी जिल्ह्यात ६,००,००० अलबेंडाझोल (Albendazole) गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे *डॉ प्रफुल्ल हुलके जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी* यांनी सांगितले आहे.

वयोगटानुसार गोळी देण्याची पद्धत:
* १ ते २ वर्षे: अर्धी गोळी (२०० मि.ग्रॅ.) बारीक पावडर करून पाण्यात विरघळवून पाजणे.
* २ ते ३ वर्षे: एक पूर्ण गोळी (४०० मि.ग्रॅ.) बारीक पावडर करून पाण्यात विरघळवून पाजणे.
* ३ ते १९ वर्षे: एक पूर्ण गोळी (४०० मि.ग्रॅ.) चावून खाण्यास देणे.

जंतसंसर्गापासून बचावासाठी खबरदारी:
दूषित माती व अस्वच्छतेमुळे जंतांचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे कुपोषण, अशक्तपणा रक्तक्षय , पोटदुखी व इतर आजार उद्भवतात. यासाठी खालील सवयी पाळाव्यात:
* जेवणापूर्वी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे.
* भाजीपाला व फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेणे.
* उकळून थंड केलेले पाणी पिणे.
* बाहेर जाताना नेहमी चपला किंवा बुटांचा वापर करणे.
* नखे नियमितपणे कापणे व उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचाच वापर करणे.

जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये मोफत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.आपल्या पाल्याचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सर्व पालकांनी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना जंतनाशक गोळी आवर्जून द्यावी आणि मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

डॉ प्रताप शिंदे
जिल्हा आरोग्य अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!