दुष्काळसदृश परिस्थितीत कृषी पंपांना २४ तास वीज द्या – खासदार डॉ. नामदेव किरसान यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

गडचिरोली : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. पिकांना पाण्याची गरज असताना कृषी पंपांसाठी होणारा अनियमित व अपुरा वीजपुरवठा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे.

या पार्श्वभूमीवर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील कृषी पंपांना २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील बहुतांश शेतकरी धान पिकावर अवलंबून आहेत. धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ज्या भागांत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी अपुऱ्या पावसाच्या परिस्थितीत कृषी पंपांच्या माध्यमातून पिकांना पाणी देणे शक्य आहे. मात्र, वीजपुरवठा नियमित नसल्याने उपलब्ध सिंचन सुविधांचा अपेक्षित वापर करता येत नसल्याची परिस्थिती आहे.

सध्या धान पिकांच्या वाढीचा महत्त्वाचा टप्पा सुरू असून, वेळेवर सिंचन न झाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना नियमित आणि अखंडित वीजपुरवठा देणे गरजेचे असल्याचे खासदार किरसान यांनी पत्रात नमूद केले आहे.

अल्प पर्जन्यमानाची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित विभागाला तातडीने निर्देश देत कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नियमित वीजपुरवठा मिळाल्यास उपलब्ध सिंचन सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून पिकांना आवश्यक पाणी देता येईल आणि दुष्काळसदृश परिस्थितीत पिके वाचविण्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होईल.

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!