गोटणगाव ग्रामपंचायतीत 1 कोटीचा घोटाळा? BDO कुरखेडा चौकशी टाळत असल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप, स्मरणपत्र सादर.

निवेदन देऊन 15 दिवस उलटले, उत्तर नाही! गोटणगावच्या ग्रामस्थांचे BDO धीरज पाटील यांना स्मरणपत्र, 7 दिवसात चौकशी सुरू करा अन्यथा.

कुरखेडा (जि. गडचिरोली): तालुक्यातील गोटणगाव ग्रामपंचायतीच्या सन 2022-23 ते 2025-26 या 4 वर्षांच्या कारभारात सुमारे 1 कोटी 1 लाख 71 हजार 698 रुपयांची कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे ही अनियमितता तत्कालीन सहाय्यक गट विकास अधिकारी D.B. उराडे यांनी स्वतः ग्रामपंचायत व प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून दिली होती.
या प्रकरणी सखोल चौकशी व सामाजिक अंकेक्षण (Social Audit) करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती कुरखेडा यांना दि. 15/09/2026 रोजी लेखी निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतेही लेखी उत्तर न मिळाल्याने आणि कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आता दि. 25/09/2026 रोजी स्मरणपत्र सादर केले असून त्यावर दि. 29/09/2026 रोजी पंचायत समिती कुरखेडाचा आवक शिक्का देखील आहे.
स्मरणपत्रातील ठळक बाबी:
1. हा निधी सार्वजनिक निधी असून यात पारदर्शकता आवश्यक आहे.
2. प्रसारमाध्यमांमध्येही या अनियमिततेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
3. केवळ निवेदन स्वीकारून कारवाई न करणे हे समाधानकारक नाही.
ग्रामस्थांच्या 9 प्रमुख मागण्या:
1. 2022-23 ते 2025-26 पर्यंतचा सर्व शासकीय निधी, अनुदान, कर व इतर उत्पन्नाचा वर्षनिहाय तपशील ग्रामसभेसमोर ठेवा.
2. सर्व खर्चाचे ग्रामसभेसमोर सामाजिक अंकेक्षण करा.
3. बँक खाते, कॅशबुक, लेजर, व्हाउचर, बिल, ठराव पुस्तिका, मोजमाप पुस्तिका (MB), कामाचे पूर्णत्व प्रमाणपत्र या सर्व अभिलेखांची तपासणी करा.
4. ज्या विकासकामांवर निधी खर्च दाखवला आहे, त्याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून गुणवत्ता व खर्चाची पडताळणी करा.
5. D.B. उराडे यांनी निदर्शनास आणलेल्या रु. 1,01,71,698.53/- च्या अनियमिततेची स्वतंत्र चौकशी करा.
6. शासकीय निधीचा अपहार, गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करा.
7. आर्थिक हानी झाल्यास वसुलीची कारवाई करा.
8. संपूर्ण चौकशी अहवाल ग्रामस्थांना उपलब्ध करून द्या.
अंतिम इशारा:
स्मरणपत्र प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाच्या आत चौकशी प्रक्रिया सुरू न झाल्यास आणि लेखी उत्तर न मिळाल्यास ग्रामविकास विभागाच्या अधिकृत तक्रार निवारण व्यवस्थेत तक्रार नोंदवून वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याचा इशारा वामन पाटणकर, देवेंद्र भोयर, राजकुमार दुगा, राध्येशाम बोदले, सुनिता मडावी, प्रतिभा माकडे, पूर्णानंद नेवारे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी दिला आहे.
या स्मरणपत्राची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार कुरखेडा, जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पाठवण्यात आली आहे.

