भामरागडमधील पूर ओसरला; पर्लकोटा पुलावरील वाहतूक सुरू, प्रशासनाकडून स्वच्छता आणि आरोग्य मोहिमेला वेग.
गडचिरोली:-

छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या तीन नद्यांना आलेल्या भीषण पुराच्या विळख्यात अडकलेल्या भामरागड शहराला अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जलमय स्थितीत असलेल्या शहरातील पुराचे पाणी काल सोमवारी ओसरले. तसेच रात्रीच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पुलावरचे पाणी उतरल्याने गेल्या चार दिवसांपासून मुख्य मार्गावर ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत झाली. त्यामुळे संपर्क तुटलेल्या परिसरातील अनेक गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तीन दिवस पुराच्या पाण्याने वेढलेल्या भामरागड शहर आणि तालुक्यातील गावांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. मात्र, तालुका प्रशासन, एसडीआरएफ (SDRF) चमू आणि स्थानिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संकटकाळात लॉयड्स मेटल्सचे वैद्यकीय पथक आणि हेलिकॉप्टर मदतीला धावून आल्याने अडकलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.
पूर ओसरल्यानंतर नगर पंचायतीने तत्काळ पुढाकार घेत शहरात व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यांवर साचलेला गाळ आणि चिखल साफ करण्यात आला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. पुराच्या पाश्र्वभूमीवर रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण खबरदारी बाळगत आहे.

